
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : दिल्लीत आज झालेल्या दोन महत्त्वाच्या राजकीय बैठकांनंतर राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली, तर दुसरीकडे ‘इंडिया’ आघाडीचीही महत्त्वाची बैठक झाली. या दोन्ही बैठका एकाच दिवशी झाल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष दिल्लीकडे लागले होते.
शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या भविष्यातील विस्तारावर चर्चा झाल्याचे सांगितले. शिवसेना अधिक मजबूत करण्यावर आणि संघटन वाढवण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुखउद्धब ठाकरे हे प्रत्यक्ष उपस्थित नसून त्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. त्यांच्या या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे.
याच पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. मागील काही घडामोडी आणि काही नेत्यांच्या भेटींनंतर ही चर्चा अधिकच तीव्र झाल्याचे दिसत आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका करत सांगितले की, इंडिया आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. त्यांच्या मते, अशा वातावरणामुळे काही नेते बैठकीपासून दूर राहत आहेत.
दिल्लीत झालेल्या या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर पुन्हा एकदा चर्चेचे वारे वाहू लागले असून पुढील काळात कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.