
Image Source:(Internet)
नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर आळा घालण्यासाठी क्राइम ब्रँचच्या एनडीपीएस पथकाने भांडेवाडी परिसरात धडक कारवाई करत दोन संशयितांना अटक केली. या कारवाईदरम्यान सुमारे 9 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना संघर्ष नगर भागात एमडी (मेफेड्रोन) ड्रग्सची देवाणघेवाण होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत विजय रहांगडाले (43) आणि शहबाज शाह यांना ताब्यात घेण्यात आले.
झडतीदरम्यान आरोपींकडून 52 ग्रॅम एमडी ड्रग्स, तीन मोबाईल फोन, एक दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण 9.04 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात विजय रहांगडाले हा सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे. त्याच्याविरोधात खून, दरोडा, चोरी आणि लूटमारसारख्या गंभीर स्वरूपाचे 15 गुन्हे नोंद असून, एनडीपीएस कायद्यांतर्गतही त्याच्यावर यापूर्वी दोन प्रकरणे दाखल आहेत.
प्राथमिक चौकशीत विजयने एका फरार व्यक्तीकडून एमडी ड्रग्स मिळवल्याची माहिती समोर आली आहे. तर शहबाज हा अमली पदार्थ खरेदी करण्याच्या उद्देशाने घटनास्थळी आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात आणखी एका संशयिताचा सहभाग असल्याचे समोर आले असून त्याचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ड्रग्स पुरवठा साखळीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध नेटवर्कमध्ये खळबळ उडाली असून अशा विशेष मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.