
Image Source:(Internet)
मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी स्वीकारावी, तर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, शिवसैनिकांच्या मनात आपल्या पक्षाचाच मुख्यमंत्री असावा, अशी भावना आहे. एकनाथ शिंदे हेच त्यांच्या मनातील मुख्यमंत्री असून आगामी काळात त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी राज्यभर जनसंपर्क मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे यांना काही कार्यक्रमांतून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना कडू यांनी शिवसेनेला कमी लेखण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असा इशारा दिला. शिवसेना ही संघर्षातून उभी राहिलेली संघटना असून तिला डावलण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे ते म्हणाले.
याशिवाय त्यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवरही सरकारकडे मागण्या मांडल्या. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान वाढवून १ लाख रुपये करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच जुन्या कर्जमाफी योजनेतील अनेक लाभार्थी अद्याप मदतीपासून वंचित असल्याचे त्यांनी नमूद केले.
दिव्यांग नागरिकांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी करताना, शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी आपला संघर्ष कायम राहील, असे बच्चू कडू यांनी सांगितले.