समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; खासगी बस ट्रकवर आदळली, 27 प्रवासी जखमी

    08-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मेहकर : समृद्धी महामार्गावर रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. पुण्याहून नागपूरकडे जाणारी खासगी प्रवासी बस अज्ञात ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडकल्याने 27 प्रवासी जखमी झाले. यामध्ये 15 जण गंभीर तर 12 जण किरकोळ जखमी झाले असून सर्वांना उपचारासाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात 8 जून रोजी पहाटे सुमारे 4.21 वाजता मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये चॅनल क्रमांक 278.800 जवळ घडला. एमएच 31 एफसी 7468 क्रमांकाची खासगी बस पुण्याहून नागपूरकडे प्रवाशांना घेऊन जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरील अज्ञात ट्रकच्या मागील बाजूस बस धडकली.

अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग फर्दापूर उपकेंद्राचे उपनिरीक्षक अरविंद तिरणकर, मेहकरचे पोलीस निरीक्षक वेंकटेश्वर अलेवार, उपनिरीक्षक कांचन जरवाल यांच्यासह पोलीस पथक अवघ्या आठ मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले.

अपघाताची तीव्रता लक्षात घेऊन तातडीने 108 रुग्णवाहिका सेवेला पाचारण करण्यात आले. बचावकार्य आणि जखमींना मदत करण्यात स्थानिक समाजसेवक व पत्रकार संतोष मालोसे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

जखमी प्रवाशांवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता हिवसे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. तसेच डॉ. स्वप्नील सुसार, डॉ. वैभव बोराडे, डॉ. यासीन शाह, डॉ. आदिल खान आणि डॉ. गणेश शेळके यांच्यासह वैद्यकीय पथकाने तत्पर सेवा दिली.

अपघातातील जखमी प्रवासी नागपूर, पुणे, चंद्रपूर, बुलढाणा, बीड, खापरखेडा आणि अहिल्यानगरसह विविध भागांतील असल्याची माहिती आहे. काही जखमींना नातेवाईकांनी पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलविले.

दरम्यान, पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत केली. सकाळी 9 वाजेपर्यंत घटनास्थळावरील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. फरार ट्रक आणि त्याच्या चालकाचा शोध सुरू असून मेहकर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

समृद्धी महामार्गासारख्या वेगवान मार्गांवर वाहन चालविताना चालकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.