लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची माहिती

    05-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याच्या १,५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला असतानाही हप्ता खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

राज्य शासनाकडून लाभार्थ्यांच्या पात्रतेची तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याने निधी वितरण प्रक्रियेला काहीसा विलंब झाला आहे. संबंधित विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, १२ ते १५ जूनदरम्यान मे महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पडताळणीनंतर अनेक महिलांचा लाभ थांबला
योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ई-केवायसी आणि अन्य पडताळणी मोहिमेनंतर मोठ्या संख्येने अर्जदार अपात्र ठरल्याची माहिती आहे. त्यामुळे लाखो महिलांचा लाभ बंद करण्यात आला असून, पात्र लाभार्थींनाच पुढील हप्ते दिले जाणार आहेत.

हप्ता उशिरा मिळण्यामागील कारणे
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही लाभार्थ्यांची बँक खाती आधारशी लिंक नसणे, डीबीटी सेवा सक्रिय नसणे किंवा अर्जाची पडताळणी पूर्ण न होणे यामुळे निधी वर्ग करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हप्त्याचे वितरण अपेक्षेपेक्षा उशिरा होत आहे.

महिलांनी काय करावे?

लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते आधारशी जोडलेले आहे का, डीबीटी सुविधा सुरू आहे का आणि अर्जाची स्थिती मंजूर (Approved) आहे का, याची खात्री करून घ्यावी. कोणतीही अडचण असल्यास संबंधित महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पात्र महिलांच्या खात्यात लवकरात लवकर हप्ता जमा व्हावा यासाठी प्रशासनाकडून आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात असल्याची माहिती मिळत आहे.