
Image Source:(Internet)
अहिल्यानगर : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर परिसरात मोठी कारवाई करत काही संशयित तरुणांची चौकशी सुरू केली आहे. पाकिस्तानमधील सोशल मीडिया अकाउंट्स आणि संशयित व्यक्तींशी संपर्क असल्याच्या माहितीच्या आधारे ही मोहीम राबविण्यात आली.
ATS आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे विविध ठिकाणी छापे टाकत अनेक मोबाईल फोन जप्त केले आहेत. या उपकरणांमधील डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू असून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
चौकशीत धक्कादायक खुलासे-
ताब्यात घेण्यात आलेल्या काही तरुणांनी चौकशीदरम्यान पाकिस्तानमधील सोशल मीडिया खात्यांशी संपर्क झाल्याची कबुली दिली आहे. एका तरुणाने इंस्टाग्रामवरून संवाद झाल्याचे सांगितले, मात्र संशय आल्याने त्याने संबंधित चॅट्स डिलीट केल्याचे नमूद केले.
दुसऱ्या एका तरुणाने पाकिस्तानमधील मोबाईल क्रमांकावरून फोन आल्याचे सांगितले. फोन करणाऱ्या व्यक्तीने परिसरातील काही व्यक्ती आणि स्थानिक परिस्थितीबाबत माहिती विचारल्याचा दावा त्याने केला. मात्र आपण कोणतीही संवेदनशील माहिती दिली नसल्याचे त्याने स्पष्ट केले.
डिलीट चॅट्सचा तपास सुरू-
तपासादरम्यान अनेक चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स हटविण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ATS ने डिजिटल फॉरेन्सिक तपासाला वेग दिला असून मोबाईलमधील डिलीट डेटा पुनर्प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, कारवाईच्या वेळी काही संशयित व्यक्ती घरी नसल्याने त्यांचा शोध सुरू आहे. पाकिस्तानमधील गुन्हेगारी नेटवर्क किंवा सोशल मीडिया हँडलर्सकडून स्थानिक तरुणांचा वापर करून कोणताही कट रचला जात होता का, या दिशेनेही तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी ATS ने तपासाची व्याप्ती वाढवली असून पुढील तपासातून आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.