कोकण विधान परिषद बिनविरोध; ‘मी केवळ दुवा होतो, सूत्रधार फडणवीसच’ – नितेश राणे

    05-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

रत्नागिरी : कोकण विभागातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी या घडामोडींवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. या यशाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाला जात असल्याचे सांगत, आपण केवळ पक्षाने दिलेली भूमिका बजावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नितेश राणे म्हणाले की, कोकणातील जागेबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली होती. त्यानंतर ठरलेल्या रणनीतीची अंमलबजावणी करण्यासाठी विविध नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. त्यानुसार आपण काम केले असून, अंतिम निर्णय आणि नियोजन हे वरिष्ठ नेतृत्वाचेच होते, असे त्यांनी सांगितले.

बाळा माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यावर प्रतिक्रिया देताना राणे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. विरोधी पक्षातील उमेदवारालाच आपल्या नेतृत्वावर विश्वास राहिला नसेल, तर त्यासाठी महायुतीला जबाबदार धरता येणार नाही, असे ते म्हणाले. तसेच, उमेदवाराने स्वखुशीने घेतलेल्या निर्णयामागे विरोधी पक्षाच्या नेतृत्वावरील नाराजी स्पष्ट दिसत असल्याचा दावाही त्यांनी केला.

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या आरोपांवरही राणे यांनी पलटवार केला. "कोणतेही आरोप करताना पुरावे असणे आवश्यक आहे. केवळ आरोप करून जनतेची दिशाभूल करता येणार नाही," असे ते म्हणाले.

महायुतीतील एकोपा आणि समन्वयामुळेच ही निवडणूक सहजपणे बिनविरोध झाली, असा दावा करत राणे यांनी महायुतीच्या संघटनात्मक ताकदीवरही भर दिला.