
Image Source:(Internet)
नवी मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे ऐरोली येथील स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले यांच्याविरोधात एका 26 वर्षीय विवाहित महिलेने गंभीर आरोप करत रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अत्याचार, धमकी आणि छळासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, जुलै 2024 मध्ये ती आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी चौगुले यांच्या निवासस्थानी गेली होती. त्यावेळी आरोपीने तिला गुंगीचे पदार्थ देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर तिचे आक्षेपार्ह फोटो काढून ते सार्वजनिक करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचेही महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
महिलेने पुढे असा दावा केला आहे की, आरोपीकडे असलेले फोटो हटविण्याची वारंवार विनंती करूनही त्याने नकार दिला. उलट संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर तिला शिवीगाळ करण्यात आली. अखेर तिने पोलिसांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली.
दुसरीकडे, साहिल चौगुले यांनी सर्व आरोप साफ फेटाळले आहेत. आपल्याविरोधात राजकीय हेतूने कट रचण्यात आला असून आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटी तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. संबंधित महिला यापूर्वीही अशा प्रकारच्या तक्रारी करून लोकांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या प्रकरणात चौगुले यांच्यासह अमित मौर्य नावाच्या व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून रबाळे पोलीस अधिक तपास करत आहेत. दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी दावे करण्यात येत असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.