
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून चार केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
भाजपच्या उमेदवार यादीत केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांचा समावेश करण्यात आलेला नाही. या दोघांचा राज्यसभेतील कार्यकाळ लवकरच संपत असून त्यांना पुन्हा उमेदवारी न मिळाल्याने मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची गच्छंती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांची उत्तर प्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी, तर हर्ष मल्होत्रा यांची दिल्ली भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटनेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्याने या दोन्ही नेत्यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी चर्चा आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात या चार मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. दरम्यान, संसदीय नियमांनुसार संसद सदस्यत्व नसलेल्या मंत्र्यांना सहा महिन्यांच्या आत लोकसभा किंवा राज्यसभेवर निवडून येणे बंधनकारक असते. त्यामुळे पुढील काही दिवसांत मोदी मंत्रिमंडळातील बदलांबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.