सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर दोन सराईत आरोपी जेरबंद; चोरीचा मुद्देमाल जप्त

Image Source:(Internet)
नागपूर : यशवंत स्टेडियम परिसरातील मां भवानी मंदिरात झालेल्या चोरीचा धंतोली पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासातून पर्दाफाश केला असून, या प्रकरणातील दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोपींच्या चौकशीतून क्वेटा कॉलनीतील शिवमंदिरात झालेल्या चोरीचाही उलगडा झाला आहे.
१ जून रोजी मां भवानी मंदिरातील देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मणी चोरीस गेल्याची घटना समोर आली होती. घटनेनंतर धंतोली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींनी चोरीपूर्वी मंदिराची रेकी केल्याचेही निष्पन्न झाले.
सखोल तपासानंतर पोलिसांनी हिंगणघाट येथील शेख सोहेल जावेद शेख आणि हुडकेश्वर येथील इरफान हमीद शेख यांना अटक केली. दोघांकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.
चौकशीदरम्यान आरोपींनी ३ जूनच्या मध्यरात्री लकडगंज हद्दीतील क्वेटा कॉलनी परिसरातील शिवमंदिरात चोरी केल्याचे उघड झाले. या ठिकाणी दानपेटी फोडून सुमारे १५ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती.
धंतोली पोलिसांच्या या कारवाईमुळे मंदिरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा भांडाफोड झाला असून, आरोपींनी शहरातील इतर मंदिरांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांच्या सतर्कतेचे आणि तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.