विधान परिषदेत भाजपची आणखी एक जागा निश्चित; अरुण लखानी बिनविरोध निवडून

    04-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार अरुण लखानी यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेसचे शैलेश अग्रवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर कोठारी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीची लढत होण्यापूर्वीच निकाल स्पष्ट झाला.

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने अरुण लखानी हे या मतदारसंघातून एकमेव उमेदवार उरले. परिणामी मतदानाची प्रक्रिया पार पडण्याची गरज भासली नाही आणि त्यांची विधान परिषदेवर निवड निश्चित झाली.

या विजयामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विदर्भातील या महत्त्वाच्या मतदारसंघावर भाजपने आपली पकड कायम राखल्याचे मानले जात आहे. उद्योग क्षेत्रातील दीर्घ अनुभव, तसेच पक्ष संघटनेतील सक्रिय भूमिका यामुळे लखानी यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास व्यक्त केला होता. भाजपचे सह-कोषाध्यक्ष म्हणूनही ते महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत.

दरम्यान, विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर अरुण लखानी आज सायंकाळी नागपूरमधील रामनगर येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली असून, भाजप पदाधिकारी आणि समर्थकांकडून जल्लोष साजरा केला जाणार आहे.