उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उद्धव ठाकरेंची कठोर भूमिका; पक्षविरोधी कारवाईचा ठपका

Image Source:(Internet)
मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना शिवसेना (ठाकरे गट) मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर ऐनवेळी माघार घेतलेल्या तीन नेत्यांवर कठोर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. महायुतीतील बहुतांश बंडखोरी शांत करण्यात यश आले असताना, महाविकास आघाडीत मात्र अनपेक्षित धक्के बसल्याचे चित्र दिसून आले.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून ठाकरे गटाने अधिकृत उमेदवार म्हणून बाळ माने यांना संधी दिली होती. मात्र, त्यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पक्ष नेतृत्व नाराज झाले. त्यानंतर बाळ माने यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
याशिवाय छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार देवयानी डोनगावकर यांनीही निवडणुकीतून माघार घेतली. या निर्णयानंतर पक्षाने देवयानी डोनगावकर आणि कृष्णा डोनगावकर यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करत पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला.
या तिन्ही नेत्यांवर पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडींमुळे ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली असून, आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.