
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यातील पावसाची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे दिसत आहेत. बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाची प्रणाली निर्माण होत असल्याने येत्या ३ ते ७ जुलैदरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कोकणासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीही होऊ शकते.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीसह विदर्भ आणि मराठवाड्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत असून, त्यामुळे मान्सूनचे वारे कमकुवत राहिले आहेत. परिणामी अनेक भागांत पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिले. मात्र, सध्या तयार होत असलेल्या हवामान प्रणालीमुळे पावसाला पुन्हा वेग मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून भात लागवडीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा आहे. नद्या आणि जलस्रोतांच्या पाणीपातळीतही हळूहळू वाढ होत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हयातनगर, लिंगी, पळशी आणि आसपासच्या भागांत शेतांमध्ये पाणी साचले असून ओढे-नाले वाहू लागले आहेत. या पावसामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.