तुकाराम मुंढेंचा अन्नसुरक्षेवर मोठा प्रहार; मुंबईतील ६ हॉटेल्स-उपाहारगृहांचे परवाने निलंबित,१९ जण अटकेत

    30-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत मुंबईतील सहा हॉटेल्स, उपाहारगृहे, बेकरी आणि क्लबचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ३१ ठिकाणी छापे टाकून तब्बल ३४ लाख ८७ हजार ६०३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि अन्य अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

या मोहिमेत प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, वाहतूक आणि वितरण करणाऱ्या १९ जणांना अटक करण्यात आली असून एका आस्थापनेला सील करण्यात आले आहे. तसेच या कारवाईदरम्यान तीन वाहनांवरही जप्तीची कारवाई करण्यात आली.

अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अस्वच्छ परिसर, मुदतबाह्य अन्नपदार्थ, चुकीच्या माहितीचे लेबल, झुरळे व उंदरांचा वावर, शीतसाखळीतील त्रुटी तसेच आवश्यक कागदपत्रांचा अभाव अशा गंभीर अनियमितता आढळून आल्या. त्यामुळे संबंधित सहा आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.

अनेक ठिकाणी गंभीर अनियमितता उघड-
तपासणीदरम्यान नरीमन पॉइंटमधील एका उपाहारगृहात चुकीच्या माहितीचे लेबल लावलेले अन्नपदार्थ आढळले, तर मुदतबाह्य अन्नपदार्थ जागेवरच नष्ट करण्यात आले. बोरिवलीतील एका बेकरीमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असतानाही अन्न उत्पादन सुरू असल्याचे तसेच मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय भांडुप, सांताक्रूझ, अंधेरी आणि वांद्रे येथील काही आस्थापनांमध्ये स्वच्छता, कीटक नियंत्रण, अन्नसुरक्षा नियमांचे पालन आणि ग्राहक तक्रार निवारण व्यवस्थेमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने एफडीएने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.