टीईटी पेपरफुटीप्रकरणी सरकारचा मोठा अॅक्शन प्लॅन; आरोपींवर मकोका, एसआयटीकडून सखोल तपास

    30-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणानंतर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यात आले आहे. यासोबतच भविष्यात परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी ऑनलाइन परीक्षांचा पर्यायही विचाराधीन असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.

शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, टीईटी परीक्षा होण्यापूर्वीच भिवंडी पोलिसांनी कारवाई करून तीन संशयितांना अटक केली आणि त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली. या प्रकरणाचे धागेदोरे राज्याबाहेरपर्यंत पोहोचत असल्याने बिहार, हरियाणा आणि दिल्ली येथे एसआयटीची पथके तपासासाठी पाठविण्यात आली आहेत. प्रश्नपत्रिका गळतीमागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

दादा भुसे यांनी स्पष्ट केले की, दोषींना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यासाठी मकोकाअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दोषींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

दरम्यान, रद्द करण्यात आलेली टीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत तांत्रिक बदल करण्यावर सरकार भर देणार असून, ऑनलाइन परीक्षा प्रणालीचा गंभीरपणे विचार सुरू आहे.

प्रश्नपत्रिकांच्या छपाईपासून वितरणापर्यंतच्या संपूर्ण यंत्रणेचे पुनर्मूल्यांकन केले जाणार असून, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी स्वतंत्र समितीही स्थापन करण्यात येणार आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणानंतर राज्य सरकारने परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.