
Image Source:(Internet)
नागपूर : गिट्टीखदान परिसरात घडलेल्या असद उर्फ अमन खान यांच्या खूनप्रकरणी नागपूर पोलिसांनी वेगवान तपास करत मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणात तीन प्रौढांसह एकूण सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी चार जण विधीसंघर्षग्रस्त बालक (अल्पवयीन) असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये जितेंद्र उर्फ जंगली पांडे, योगेंद्र उर्फ लाला शिवाकांत पांडे आणि दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता यांचा समावेश आहे. तिन्ही प्रौढ आरोपींना पुढील चौकशीसाठी गिट्टीखदान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, अल्पवयीनांबाबत स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
सोमवारी सायंकाळी फुटाळा तलाव परिसरात दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा वाद हिंसक बनला. धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या हल्ल्यात असद उर्फ अमन खान यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मयूर जाधव गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी काही तासांतच सातही संशयितांना ताब्यात घेतले.
या हत्येमागे केवळ किरकोळ वाद होता की त्यामागे जुने वैमनस्य अथवा गँगवॉरची पार्श्वभूमी आहे, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, शहरात शांतता अबाधित राहावी यासाठी संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.