केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सिया गोयलच्या वकिलांकडून भाऊ साहिलला १० कोटींची मानहानीची नोटीस

    30-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता आणखी एक नवे वळण आले आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या सिया गोयलच्या वतीने काम करणारे ॲडव्होकेट आशिष श्रीवास्तव यांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याला तब्बल १० कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ हत्येच्या तपासापुरते मर्यादित न राहता आता न्यायालयीन आणि कौटुंबिक वादाच्या नव्या टप्प्यात पोहोचले आहे.

या वादाची सुरुवात साहिल गोयल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ॲडव्होकेट आशिष श्रीवास्तव यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर झाली. कुटुंबाने त्यांची सियाच्या वकील म्हणून नियुक्ती केलेली नसल्याचा दावा साहिल यांनी केला. तसेच सियाच्या स्वाक्षऱ्या फसवणुकीने घेतल्या गेल्या असाव्यात, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

या आरोपांना उत्तर देताना ॲडव्होकेट आशिष श्रीवास्तव यांनी कायदेशीर नोटीस बजावली. नोटीसमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, सिया गोयल यांनी स्वतःच्या इच्छेने त्यांची कायदेशीर प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. यासाठी सियाने विधिवत वकालतनाम्यावर स्वाक्षरी केली असून, तो दस्तऐवज सक्षम न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार संबंधित कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

नोटीसमध्ये साहिल गोयल यांच्यावर माध्यमांसमोर तथ्यांची पडताळणी न करता दिशाभूल करणारी विधाने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वक्तव्यांमुळे ॲडव्होकेट आशिष श्रीवास्तव यांच्या व्यावसायिक प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर ट्रोलिंग, अपमानास्पद प्रतिक्रिया, धमक्या तसेच व्यावसायिक नुकसान झाल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर साहिल गोयल यांनी केलेल्या विधानांमुळे झालेल्या कथित मानसिक आणि व्यावसायिक नुकसानीसाठी १० कोटी रुपयांच्या मानहानीची भरपाई मागण्यात आली आहे. त्यामुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणासोबतच आता या नव्या कायदेशीर संघर्षाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.