
Image Source:(Internet)
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात घडलेल्या एका अत्यंत संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. कापूसवाडी परिसरातील जंगलात 40 वर्षीय महिलेवर दोन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या अमानुष कृत्याचा व्हिडिओ चित्रीत करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई करत आतापर्यंत 14 आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला तिच्या काही परिचितांसोबत जंगल परिसरात असताना काही तरुण तेथे आले. सुरुवातीला त्यांनी धमकावण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर दोन आरोपींनी महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या इतर आरोपींनी पीडितेला मदत करण्याऐवजी संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या कृत्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात 15 जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार करणाऱ्या दोघांसह 14 आरोपींना अटक करण्यात आली असून, फरार असलेल्या एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी तपास पथकाला दिले आहेत.
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.