
Image Source:(Internet)
देहरादून : उत्तराखंडमधील चारधाम यात्रेदरम्यान दुर्घटनांचे सत्र सुरूच असून यमुनोत्री यात्रेवर आलेल्या आणखी एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे यंदाच्या चारधाम यात्रेत मृत्यू झालेल्या भाविकांची संख्या १४ वर पोहोचली आहे. त्याचवेळी राज्यातील वेगवेगळ्या भागांत झालेल्या अपघातांमध्ये सात जणांना जीव गमवावा लागला असून सहा जण जखमी झाले आहेत.
मध्य प्रदेशातील हरिमोहन (वय ६१) हे आपल्या कुटुंबीयांसह चारधाम यात्रेसाठी आले होते. यमुनोत्री मार्गावरील जानकीचट्टी परिसरात त्यांची अचानक प्रकृती खालावली. ते बेशुद्ध झाल्यानंतर कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी त्यांना तातडीने आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, चमोली जिल्ह्यात रुपकुंड मार्गावरील लवाणी गावाजवळ कार खोल दरीत कोसळून एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृत नातेवाइकाचा मृतदेह घेऊन परतत असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेत आणखी तिघे जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगनानी परिसरातही भीषण अपघात झाला. चारधाम यात्रेसाठी आलेल्या नागपूरच्या दामोदर रामटेक्कर (७७) आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी रामटेक्कर (६७) यांचा कार दरीत कोसळल्याने मृत्यू झाला. या अपघातात आणखी तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याशिवाय अल्मोडा जिल्ह्यात गढोली गावाजवळ ट्रॅक्टर-ट्रॉलीचा अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला.
या सलग दुर्घटनांमुळे चारधाम यात्रेच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने यात्रेकरूंना प्रवासापूर्वी आरोग्य तपासणी करून घेण्याचा, वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्याचा आणि प्रकृती अस्वस्थ वाटल्यास त्वरित उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. यात्रेदरम्यान आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने पुन्हा अधोरेखित केले आहे.