
Image Source:(Internet)
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या निकालानंतर एक महत्त्वाची तांत्रिक अडचण समोर आली आहे. काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व उत्तीर्ण प्रमाणपत्रांवर छायाचित्र मुद्रित न झाल्याने शिक्षण मंडळाने तातडीने दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली आहे.
यंदा बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे १२.८६ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र निकालानंतर वितरित करण्यात आलेल्या काही गुणपत्रिकांमध्ये विद्यार्थ्यांचे फोटो नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब संबंधित विभागीय मंडळांच्या माध्यमातून राज्य मंडळापर्यंत पोहोचल्यानंतर त्वरित पावले उचलण्यात आली.
मंडळाने सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना अशा विद्यार्थ्यांची छायाचित्रे पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत. फोटो JPG स्वरूपात असणे आवश्यक असून संबंधित विद्यार्थ्याचा आसन क्रमांक (Seat Number) फाइलच्या नावात नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच फोटोचा आकार निश्चित मर्यादेत ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, यावर्षी प्रथमच गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकत्रित स्वरूपात देण्याची नवीन प्रणाली लागू करण्यात आली. या दस्तऐवजात विद्यार्थ्याचा फोटो आणि क्यूआर कोडचा समावेश करण्यात आला होता. यामुळे कागदपत्रांची पडताळणी अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचा दावा करण्यात आला होता.
मात्र काही विद्यार्थ्यांच्या छायाचित्रांबाबत माहिती अपूर्ण किंवा चुकीची राहिल्याने ही अडचण निर्माण झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यापूर्वी मंडळाने फोटो व नाव दुरुस्तीसाठी विशेष ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली होती. तरीही काही प्रकरणांमध्ये आवश्यक सुधारणा वेळेत न झाल्यामुळे गुणपत्रिकांमध्ये त्रुटी राहिल्या.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये फोटो दिसत नाही किंवा चुकीचा फोटो छापला गेला आहे, त्यांनी आपल्या शाळेशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे. दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुधारित गुणपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.