
Image Source:(Internet)
नाशिक : नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून बंडखोर उमेदवारांमुळे सत्ताधारी आघाडीची चिंता वाढली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यातही काही इच्छुक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास तयार नसल्याने महायुतीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
सुरुवातीला नाशिक विधान परिषदेसाठी भाजपकडून गणेश गीते यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र नंतर झालेल्या महायुतीच्या बैठकीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्यानंतर शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
दरम्यान, गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधील विष्णुपंत म्हैसधुने आणि गोरख बोडके यांनीही बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीच्या रणनीतीला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या घडामोडींनंतर शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी गीते बंधूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप त्यांच्याशी कोणत्याही शिवसेना नेत्यांचा संपर्क झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बंडखोरांची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे गोरख बोडके यांनी मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांची भेट घेत निवडणुकीतून माघार घेण्याबाबत चर्चा केल्याचे समोर आले आहे. या भेटीनंतर काही बंडखोर उमेदवार माघार घेतील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे, नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अद्याप अधिकृत उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे आघाडीशी संबंधित नगरसेवकांचे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
बंडखोरी, नाराजी आणि उमेदवारीच्या राजकारणामुळे नाशिक विधान परिषद निवडणूक चांगलीच रंगतदार बनली असून महायुतीसमोरील हे संकट कसे सोडवले जाते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.