ताडोबाच्या ‘झीनत’ची आनंदवार्ता; ओडिशात चार बछड्यांना जन्म, व्याघ्र संवर्धनाला नवी उभारी

    03-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर :
महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात पाठविण्यात आलेल्या ‘झीनत’ या वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला आहे. या घटनेमुळे आंतरराज्यीय व्याघ्र स्थलांतरण आणि संवर्धन उपक्रमाला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

सिमिलीपालमध्ये वाघांची संख्या वाढविणे आणि त्यांची आनुवंशिक विविधता मजबूत करणे या उद्देशाने ओडिशा सरकारने ताडोबातील वाघांचे स्थलांतरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २०२४ मध्ये ‘जमुना’ आणि ‘झीनत’ या दोन वाघिणींना सिमिलीपालमध्ये सोडण्यात आले होते.

स्थलांतरणानंतर काही महिन्यांतच ‘झीनत’ने जंगलाची सीमा ओलांडून झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये भटकंती केली होती. सुमारे २५० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर वन विभागाने विशेष मोहिम राबवत तिला सुरक्षितपणे परत आणले. त्यानंतर तिच्यावर काही काळ बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आणि एप्रिल २०२५ मध्ये तिला पुन्हा सिमिलीपालच्या जंगलात मुक्त करण्यात आले.

वन विभागाच्या माहितीनुसार, जंगलात स्थानिक नर वाघासोबत संयोग झाल्यानंतर झीनतने चार बछड्यांना जन्म दिला आहे. सध्या वाघीण आणि तिच्या पिल्लांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर सॅटेलाइट कॉलरच्या माध्यमातून सतत नजर ठेवली जात आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाढती वाघसंख्या देशातील इतर व्याघ्र प्रकल्पांसाठीही महत्त्वाची ठरत आहे. यापूर्वी सह्याद्री आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्र क्षेत्रातही ताडोबातील वाघांचे यशस्वी पुनर्वसन करण्यात आले आहे.

झीनतच्या चार बछड्यांच्या जन्मामुळे सिमिलीपालमध्ये वाघसंवर्धनाला मोठी चालना मिळाली असून ताडोबातून स्थलांतरित करण्यात आलेल्या वाघांच्या यशस्वी पुनर्वसनाचा हा आणखी एक महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.