
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यातील वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसह पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती वेगाने होत असून मान्सून लवकरच देशात सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, केरळमध्ये मान्सूनचे आगमन ४ जूनच्या सुमारास होण्याची शक्यता असून त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सूनची वाटचाल सुरू होणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्राचे संचालक बिक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी सध्या वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे केरळमध्ये प्रवेश झाल्यानंतर काही दिवसांतच मान्सून देशाच्या मध्य भागाकडे सरकेल. मान्सूनचा वेग कायम राहिल्यास १० ते ११ जूनदरम्यान कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसरात त्याचे आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. पुढील काही दिवसांत या हवामानाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता असून विशेषतः कोकण आणि गोवा भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने सातारा, कोल्हापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असून ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातही पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. संध्याकाळच्या वेळेत वादळी ढगांची निर्मिती होऊन काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. ४ जूनपासून वातावरणात बदल जाणवू लागेल आणि तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ८ आणि ९ जूननंतर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनानेही सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे दिसत आहेत.