दिल्लीतील मालवीय नगरात अग्नितांडव; हॉटेलला लागलेल्या आगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू

    03-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी घडलेल्या भीषण आग दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. फ्लरिश स्टे हॉटेलमध्ये लागलेल्या आगीने काही मिनिटांतच विक्राळ रूप धारण केल्याने हॉटेलमध्ये अडकलेल्या पाहुण्यांमध्ये घबराट पसरली.

माहितीनुसार, सकाळी सुमारे ८.५० वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या रेस्टॉरंट भागात आग लागली. त्यानंतर आगीने वेगाने वरच्या मजल्यांवरील खोल्या आणि बेसमेंटपर्यंत फैलाव केला. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांमुळे अनेक जण हॉटेलमध्ये अडकून पडले.

जीव वाचवण्यासाठी काहींनी थेट तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून उड्या मारल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत इमारतीखाली गाद्या अंथरून बचावकार्याला हातभार लावला.

दिल्ली अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव मोहीम राबवली. या मोहिमेत सुमारे ४० जणांची सुटका करण्यात आली. तळघरात अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात यश आले. जखमींना तातडीने विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उपचारासाठी आणलेल्या ३९ जणांपैकी २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. यापैकी ८ जण व्हेंटिलेटरच्या सहाय्याने जीवनासाठी संघर्ष करत आहेत.

मृतांमध्ये भारतीयांसोबतच मध्य आशिया आणि आफ्रिकेतील काही परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. आग लागण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या दुर्घटनेमुळे राजधानीत शोककळा पसरली असून अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.