महागाईविरोधी आंदोलनात गोंधळ;रोहित पवार, जितेंद्र आव्हाड,रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात

    03-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. सिडको प्रदर्शन केंद्राबाहेर झालेल्या या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी चूल मांडून, भांडी वाजवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि आंदोलक व पोलिस आमनेसामने आले. यानंतर रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, रोहिणी खडसे यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रोहिणी खडसे यांना पोलिसांनी उचलून नेत असल्याचे दृश्यही पाहायला मिळाले.

आंदोलनानंतर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी राज्यात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचाही अधिकार उरलेला नसल्याची टीका केली. आंदोलन करणाऱ्या नेत्यांना ताब्यात घेणे चुकीचे असून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी म्हटले.

तर सुप्रिया सुळे यांनी महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या भ्रष्टाचारामुळे देशाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक बनल्याचा आरोप करत याच मुद्द्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगितले.

रोहित पवार यांनीही सरकारवर निशाणा साधताना, "झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन आहे. देशात अघोषित आणीबाणीची स्थिती असून नागरिकांना आपली मते मांडणेही कठीण झाले आहे," असे म्हटले. तसेच शेतकरी कर्जमाफी योजनेवर टीका करत, कर्जमाफीच्या अटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा दावा त्यांनी केला.

या आंदोलनामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून महागाई आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.