शिवसेना विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण, ‘निर्णय शिंदेच घेतील’; अब्दुल सत्तार यांचे विधान

    03-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : शिवसेना एकत्र येणार का, विलिनीकरण होणार का, या चर्चांना पुन्हा वेग आला असतानाच शिवसेना आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. शिवसेनेच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे सांगत त्यांनी विविध राजकीय चर्चांना नवे वळण दिले आहे.

वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सत्तार म्हणाले, “शिवसेनेचे विलिनीकरण करायचे की केवळ गळाभेट घ्यायची, याचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदेच घेतील. पक्षप्रमुख म्हणून तो अधिकार त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी घेतलेला कोणताही निर्णय आम्हाला मान्य असेल.”

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा जवळीक वाढत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच सत्तार यांची अंबादास दानवे यांच्यासोबत झालेली भेट आणि त्यानंतरचे राजकीय संकेत यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी अलीकडेच “पश्चात्ताप करून परत यायचे असेल तर मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत,” असे वक्तव्य केले होते. याबाबत प्रतिक्रिया देताना सत्तार यांनी कोणतीही शक्यता नाकारली नाही. “आमचे वरिष्ठ नेते जे आदेश देतील, तोच आमचा मार्ग असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच महायुती सरकारमधील शिवसेनेच्या कामगिरीचाही उल्लेख करत, “आम्ही जनतेसाठी चांगले काम केले आहे. आमच्या कामाची दखल भाजपनेही घ्यायला हवी,” असे मत सत्तार यांनी व्यक्त केले.

अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात शिवसेना एकत्रीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले असून आगामी काळात एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.