
Image Source:(Internet)
पुणे: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने कठोर निर्णय देत आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून राज्यभरातून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
१ मे २०२६ रोजी भोर तालुक्यातील नसरापूर येथे आरोपीने खाऊचे आमिष दाखवून चिमुकलीला सोबत नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून पुरावे नष्ट करण्यासाठी तिची हत्या करण्यात आली. मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवण्यात आल्याने या अमानुष घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी चिमुकलीला घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले. त्याआधारे पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, आरोपीच्या कुटुंबीयांनीही त्याच्यासाठी कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षेची मागणी केली होती.
यापूर्वी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते. शिक्षेबाबतचा अंतिम निर्णय २९ जूनपर्यंत राखून ठेवण्यात आला होता. सोमवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा गुन्हा 'दुर्मीळातील दुर्मीळ आणि अत्यंत क्रूर स्वरूपाचा' असल्याचे नमूद करत आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.
निकालावेळी पीडित मुलीचे आई-वडील न्यायालयात उपस्थित होते. निर्णय जाहीर होताच त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आपल्या मुलीला अखेर न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या घटनेनंतर राज्यभरातून निषेध, आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले होते. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि राजकीय नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. विशेष न्यायालयाच्या या निर्णयामुळे या बहुचर्चित प्रकरणाचा न्यायालयीन शेवट झाला असून, महिला आणि बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांविरोधात कायदा कठोर भूमिका घेईल, असा स्पष्ट संदेश या निकालातून देण्यात आला आहे.