नसरापूर प्रकरणात वेगवान न्याय; न्यायालयाच्या कामगिरीचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक

    29-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई: भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण न्यायप्रक्रियेचे कौतुक केले. विधिमंडळात बोलताना त्यांनी हा निकाल वेगवान तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयाच्या तत्पर कामकाजाचे फलित असल्याचे सांगितले.

फडणवीस म्हणाले, गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून अवघ्या १४ दिवसांत आरोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यानंतर आरोप निश्चितीपासून साक्षीदारांच्या जबाबांपर्यंत सर्व प्रक्रिया सलग पार पडली. केवळ २९ दिवसांत ५५ साक्षीदारांची तपासणी आणि उलटतपासणी पूर्ण झाली. त्यामुळे गुन्हा घडल्यापासून अवघ्या ५५ दिवसांत आरोपीला दोषी ठरवत न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

या खटल्याची जलदगतीने सुनावणी व्हावी यासाठी विशेष न्यायमूर्ती साळुंके यांनी स्वतःच्या सुट्ट्याही रद्द केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. न्याय विलंबाने नव्हे, तर वेळेत मिळणे हीच गुन्हेगारांवर प्रभावी जरब बसवण्याची खरी गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

"अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपींना कठोर शिक्षा मिळण्याइतकेच ती वेळेत मिळणे महत्त्वाचे आहे. नसरापूर प्रकरणात न्यायालयाने दिलेला हा निकाल देशासमोर आदर्श निर्माण करणारा आहे," असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी तपासाची सूत्रे प्रभावीपणे हाताळणारे गिल आणि त्यांच्या पथकाचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले. पोलिसांनी वैज्ञानिक पद्धतीने भक्कम पुरावे गोळा केल्यामुळे सरकारी पक्षाला न्यायालयात आरोपीविरोधात ठोस बाजू मांडता आली आणि अखेर पीडितेला न्याय मिळवून देता आला, असेही फडणवीस यांनी नमूद केले.