
Image Source:(Internet)
नागपूर: नागपूर शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. पोलिसांची भीती सामान्य नागरिकांनी नव्हे, तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी बाळगली पाहिजे.
नांगरे पाटील म्हणाले की, नागपूर हे वेगाने विस्तारत असलेले शहर असून बदलत्या परिस्थितीनुसार पोलिसिंग अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांचा अवैध व्यापार, महिलांवरील अत्याचार आणि सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष भर दिला जाईल. शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक स्तरावर काटेकोर अंमलबजावणी केली जाईल.
नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी लोकाभिमुख प्रशासन राबविण्यात येईल. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पारदर्शक पद्धतीने काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी ही विश्वासाची पावती असल्याचे नमूद करत नांगरे पाटील म्हणाले की, कायद्याची अंमलबजावणी करताना कोणाच्याही दबावाला बळी पडले जाणार नाही. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई हा पोलीस दलाचा मूलमंत्र असेल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थितीबाबत निर्माण झालेल्या चर्चेलाही त्यांनी उत्तर दिले. गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यक्रमांना आपण निमंत्रणानुसार उपस्थित राहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या माध्यमातून युवकांना व्यसनमुक्ती, समाजसेवा आणि पोलीस सेवेत करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
"माझी बांधिलकी कोणत्याही संघटना किंवा विचारसरणीशी नसून केवळ भारतीय राज्यघटनेशी आहे. संविधानाने दिलेल्या अधिकार आणि कर्तव्यांच्या चौकटीत राहूनच माझे काम सुरू राहील," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधातही कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पोलीस दलाचे मनोबल वाढविणे आणि जनतेच्या सहभागातून सुरक्षित, विश्वासार्ह आणि गुन्हेमुक्त नागपूर घडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.