राष्ट्रवादीकडे पुन्हा अर्थखात्याची धुरा? जय पवारांचे सूचक वक्तव्य

    29-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

बारामती : राज्याच्या अर्थखात्याबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच यासंदर्भात अधिकृत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

बारामती येथे स्वर्गीय अजित पवार यांच्या सहवासात काम केलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आजी-माजी सदस्यांसाठी आयोजित कृतज्ञता मेळाव्यात जय पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसह विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

भाषणादरम्यान जय पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाचा उल्लेख करत त्यांच्या अकाली जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. तसेच लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना भरघोस मताधिक्य दिल्याबद्दल बारामतीतील मतदारांचे आभार मानले.

अर्थखाते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसल्यामुळे राज्यातील विकासकामांवर परिणाम होत असल्याची चर्चा चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्पीय प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरत्या स्वरूपात अर्थखाते स्वतःकडे ठेवले, असेही त्यांनी सांगितले.

यापुढे अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा जय पवार यांनी केला. योग्य वेळी यासंदर्भातील निर्णय जाहीर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, बारामती येथे स्वर्गीय अजित पवार यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणाही जय पवार यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या अर्थखात्याची जबाबदारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात नव्याने चर्चांना उधाण आले आहे.