पाचवीच्या पाठ्यपुस्तकात ऐश्वर्या रायच्या 'निंबूडा' गाण्याची छपाई; ओडिशात मोठा गोंधळ

    29-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

भुवनेश्वर: ओडिशामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकात चुकून अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील लोकप्रिय 'निंबूडा-निंबूडा' हे गाणे छापण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके शाळांमध्ये पोहोचल्यानंतर ही गंभीर चूक निदर्शनास आली. त्यानंतर पालक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी पाठ्यपुस्तकांच्या संपादन आणि गुणवत्ता तपासणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या पुस्तकांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. तब्बल 55 पाठ्यपुस्तकांमध्ये 1,678 चुका असल्याचे समोर आल्याने हा मुद्दा अधिकच गंभीर बनला आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात अशा स्वरूपाच्या चुका कशा राहिल्या, असा सवाल उपस्थित केला आहे. शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवरही टीकेची झोड उठली आहे.

या प्रकाराची दखल घेत ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करत काही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.