काँग्रेसशीच माझी नाळ, पक्षांतराच्या अफवा निराधार; विजय वडेट्टीवार यांचे स्पष्ट वक्तव्य

    26-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरला होता. मात्र, या सर्व चर्चांना स्वतः वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत आपण काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असून पक्ष सोडण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचे ठामपणे सांगितले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अनेक नेत्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याला शिवसेनेत यायचे असल्यास त्याचे स्वागतच असेल, असे वक्तव्य केले होते. विजय वडेट्टीवार यांच्यासारखा अनुभवी नेता शिवसेनेत आला तर पक्षासाठी ते चांगले ठरेल, असेही त्यांनी म्हटले होते. या वक्तव्यानंतर वडेट्टीवार यांच्या पक्षांतराच्या चर्चांना अधिक वेग आला.

या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, "मी काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. पक्षाने माझ्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असे सांगितले.

ते पुढे म्हणाले, "महायुती सरकारच्या अपयशावर मी आवाज उठवला की, माझ्याबाबत मुद्दाम अफवा पसरवल्या जातात. कधी शिंदे गटात जाणार असल्याचे सांगितले जाते, तर कधी पक्षबदलाच्या बातम्या पसरवल्या जातात. या सर्व अफवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत."

वडेट्टीवार यांनी माध्यमांवरही नाराजी व्यक्त केली. कोणतेही ठोस तथ्य नसताना अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात शेतकरी, बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था यांसारखे अनेक गंभीर प्रश्न असताना त्यावर चर्चा होण्याऐवजी अफवांना महत्त्व दिले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेसच्या विचारसरणीशी आपण पूर्णपणे बांधील असून कोणत्याही पदासाठी किंवा सत्तेसाठी आपल्या तत्त्वांशी तडजोड करणार नसल्याचा पुनरुच्चार करत वडेट्टीवार यांनी पक्षांतराच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.