केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; शिवसेनेच्या दोन खासदारांना मंत्रिपदाची संधी?

    26-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून, येत्या दोन-तीन दिवसांत काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन खासदारांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. त्यानंतर विस्ताराच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या विस्तारात खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून कॅबिनेट दर्जा मिळू शकतो, तर नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले खासदार संजय बंडू जाधव यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केवळ आयुष मंत्रालयाची जबाबदारी कायम राहण्याचीही चर्चा आहे.

याशिवाय, माजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी दिली जाऊ शकते, तर माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचेही मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या राजकीय घडामोडीनंतर या खासदारांना केंद्रात प्रतिनिधित्व मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या या सर्व घडामोडी सूत्रांच्या माहितीनुसार आणि राजकीय चर्चांपुरत्याच मर्यादित आहेत.