प्रसादाच्या नावाखाली श्रद्धेची फसवणूक; तुकाराम मुंढेंचा शिर्डीत भेसळखोरांवर दणका, 650 किलो निकृष्ट पेढा नष्ट

    26-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या श्रद्धेशी आणि आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. शिर्डीतील साई मंदिर परिसरातील प्रसाद विक्री केंद्रे आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर टाकलेल्या धाडीत तब्बल 650 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त करून नष्ट करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळखोरीविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे पेढे विकले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मुंढे यांच्या निर्देशानुसार अहिल्यानगर येथील एफडीए पथकाने शिर्डीत धाडसत्र राबवत विविध दुकाने आणि उत्पादन केंद्रांची तपासणी केली. या मोहिमेत सुमारे दोन लाख रुपये किमतीचा निकृष्ट पेढा जप्त करण्यात आला. जप्त केलेला संपूर्ण साठा नियमानुसार नष्ट करण्यात आला.

विशेष म्हणजे, गेल्या 15 दिवसांत दुसऱ्यांदा शिर्डीत अशी मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रसादाच्या नावाखाली भेसळयुक्त किंवा निकृष्ट अन्नपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

भाविकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला असून आगामी काळातही अशा धाडसत्रांची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.