आमच्या नादी लागू नका, डोकी भडकली तर...; पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर राज ठाकरेंचा इशारा

    26-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : मुंबईतील रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत कठोर भूमिका मांडली. राजकीय हेतूने समाजांमध्ये तणाव निर्माण केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी अशा गोष्टींपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

राज ठाकरे म्हणाले, "कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली येऊन आमच्याशी संघर्ष करू नका. काही जण तुमचा वापर करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमची डोकी थोडीफार भडकतील, पण आमची भडकली तर त्याचे परिणाम वेगळे असतील."

जैन मुनींच्या आगमनावेळी रस्त्यावर पांढरे पट्टे रंगवण्याच्या प्रथेवरही त्यांनी आक्षेप घेतला. "जर तुमच्या सोसायटीत मुनी येणार असतील, तर त्यांच्यासाठी कार्पेट अंथरा आणि कार्यक्रम संपल्यानंतर ते काढून टाका. मात्र सार्वजनिक रस्त्यांवर सरसकट पांढरे पट्टे रंगवण्यामागचा उद्देश काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

गेली अनेक दशके महाराष्ट्रात गुजराती आणि जैन समाज शांततेने राहत असल्याचे सांगत, गेल्या दहा-बारा वर्षांतच अशा प्रकारचे वाद वाढल्याचे त्यांनी नमूद केले. "वरच्या स्तरावर काही व्यक्ती सत्तेत आहेत म्हणून कोणालाही मनमानी करण्याचा अधिकार मिळत नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाहतूक विभागाच्या अधिकारक्षेत्रातील काम स्वतःहून करण्याची गरज नसल्याचे सांगत, "रस्त्यांवर पांढरे पट्टे मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ट्रॅफिक विभागाचे काम तुम्ही का करता?" असा टोला त्यांनी लगावला.

राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या धार्मिक भावना मान्य असल्याचे स्पष्ट करत, "धर्माचे पालन करा, धार्मिक कार्यक्रम करा, त्याला कुणाचाही विरोध नाही. आजपर्यंत तुमच्या धर्माचरणात कोणी अडथळा आणलेला नाही. माझ्या घरीही जैन मुनी आले आहेत. मात्र समाजात अनावश्यक वाद निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या आणि हा संदेश आपल्या समाजापर्यंत पोहोचवा," असे आवाहनही त्यांनी केले.