
Image Source:(Internet)
मुंबई : आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदा मोठे नियोजन केले आहे. राज्यभरातील विठ्ठल भक्तांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी तब्बल ५,५०० हून अधिक विशेष एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय प्रवाशांच्या सुविधेसाठी बसस्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ही विशेष सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास, त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बसची व्यवस्था करण्यात येणार आहे.
यंदाही शासनाच्या विविध प्रवासी सवलती या विशेष बस सेवेला लागू राहणार आहेत. महिला सन्मान योजनेअंतर्गत महिला प्रवाशांना तिकीटदरात ५० टक्के सवलत मिळणार असून, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेनुसार ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
वारीदरम्यान पंढरपुरात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय कॉलेज) येथे चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, संगणकीकृत आरक्षण केंद्र तसेच चौकशी कक्ष उपलब्ध असतील.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ३०० विशेष बसेस अधिक सोडण्यात येणार असून, वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे कोणत्याही प्रवाशाची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने सर्व तयारी पूर्ण केल्याचे सांगण्यात आले आहे.