धावत्या रेल्वेत उमटला नवजीवनाचा आनंद; टीटीईंच्या तत्परतेमुळे महिलेची सुखरूप प्रसूती

    26-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : संकटसमयी दाखवलेले प्रसंगावधान आणि माणुसकीचे दर्शन अनेकदा एखाद्याचे आयुष्य वाचवते. अशीच एक हृदयस्पर्शी घटना यशवंतपूर–लखनऊ एक्स्प्रेसमध्ये घडली. नागपूरहून इटारसीकडे प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर रेल्वेतील दोन कर्मचाऱ्यांनी वेळेवर निर्णय घेत धावत्या रेल्वेतच सुरक्षित प्रसूतीची व्यवस्था केली. त्यांच्या तत्परतेमुळे महिलेने एका निरोगी बाळाला जन्म दिला.

माहितीनुसार, २३ जून रोजी यशवंतपूर–लखनऊ एक्स्प्रेसच्या एस-२ स्लीपर डब्यात वरिष्ठ तिकीट परीक्षक संजय कुमार चौहान नियमित तिकीट तपासणी करत होते. त्यावेळी एका प्रवाशाने एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली. चौकशी केली असता एस-२ डब्यातील बर्थ क्रमांक १० वर प्रवास करणाऱ्या २३ वर्षीय रेखा यांना प्रसूती वेदना सुरू झाल्याचे लक्षात आले.

रेल्वे घोडाडोंगरी स्थानकाच्या परिसरात असताना परिस्थितीची गंभीरता ओळखून संजय कुमार चौहान यांनी एसी डब्यात कार्यरत मुख्य आरक्षण पर्यवेक्षक पप्पू राम मीणा यांना तातडीने मदतीसाठी बोलावले. दोघांनी मिळून बर्थ क्रमांक ९ ते १४ पर्यंतचा संपूर्ण भाग रिकामा करून तात्पुरता प्रसूती कक्ष तयार केला. त्यानंतर रेल्वेत प्रवास करणाऱ्या अनुभवी महिला प्रवाशांच्या मदतीने प्रसूतीची आवश्यक व्यवस्था करण्यात आली.

दरम्यान, नागपूर आणि भोपाळ येथील रेल्वे वाणिज्य नियंत्रण कक्षाशी सातत्याने संपर्क ठेवून पुढील वैद्यकीय मदतीचे नियोजनही करण्यात आले. काही वेळातच महिलेची सुरक्षित प्रसूती झाली आणि तिने एका निरोगी मुलाला जन्म दिला. ही आनंदाची बातमी समजताच रेल्वेतील प्रवाशांनी टाळ्यांच्या गजरात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.

यानंतर रेल्वे इटारसी स्थानकात पोहोचताच आधीच सज्ज असलेल्या वैद्यकीय पथकाने माता आणि नवजात बालकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दोघांचीही प्रकृती उत्तम आणि धोक्याबाहेर असल्याचे सांगितले.

या संपूर्ण घटनेतून रेल्वे कर्मचारी केवळ तिकीट तपासणीची जबाबदारी पार पाडत नाहीत, तर आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या मदतीसाठीही ते तितक्याच तत्परतेने उभे राहतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. संजय कुमार चौहान आणि पप्पू राम मीणा यांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य संकटाचे रूपांतर एका नवजीवनाच्या आनंददायी क्षणात झाले.