सोने-चांदीच्या आजच्या दरात मोठी घसरण, खरेदीदारांसाठी दिलासा

    26-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम आजही सराफा बाजारात दिसून आला. शुक्रवार (२६ जून) रोजी सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा लक्षणीय घट झाली असून, दागिने खरेदी करणाऱ्यांसह गुंतवणूकदारांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९४० रुपयांनी घसरून १ लाख ४० हजार १३० रुपये झाला आहे. गुरुवारी हा दर १ लाख ४१ हजार ७० रुपये होता. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याच्या किमतीतही प्रति १० ग्रॅम ८६० रुपयांची घट झाली असून, आजचा भाव १ लाख २८ हजार ३६० रुपये इतका नोंदवला गेला आहे. काल हा दर १ लाख २९ हजार २२० रुपये होता.

चांदीच्या दरातही घसरण कायम आहे. गुरुवारी प्रति किलो तब्बल १० हजार रुपयांची घसरण झाल्यानंतर आज आणखी १०० रुपयांची घट झाली. त्यामुळे चांदीचा दर २ लाख ३४ हजार ९०० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. काल हा दर २ लाख ३५ हजार रुपये होता.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज संस्था UBS ने सोन्याच्या किमतींबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. संस्थेच्या मते, सध्या सुरू असलेली घसरण ही तात्पुरती असून, वर्षअखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस ५,५०० डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सध्याची किंमत अनुकूल ठरू शकते, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरची वाढती मजबुती, फेडरल रिझर्व्हची कठोर भूमिका आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे सध्या सोने-चांदीच्या किमतींवर दबाव कायम आहे. मात्र, जागतिक परिस्थितीत बदल झाल्यास येत्या काही महिन्यांत या दरांमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.