
Image Source:(Internet)
पुणे : लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येप्रकरणात अटक झालेल्या सिया गोयलच्या वडिलांनी आपल्या मुलीविरोधातच कठोर भूमिका घेत न्यायालयाकडे कडक शिक्षेची मागणी केली आहे. मुलगी दोषी सिद्ध झाल्यास तिच्याविषयी कोणतीही सहानुभूती दाखवू नये, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
प्रवीण गोयल यांनी एका मुलाखतीत बोलताना, "या प्रकरणात माझी मुलगी दोषी ठरली, तर तिला कायद्यानुसार कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. केतनला ज्या ठिकाणी जीव गमवावा लागला, त्याच ठिकाणी तिलाही शिक्षा व्हावी," अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
केतन अग्रवाल हा केवळ होणारा जावई नव्हता, तर तो आमच्या कुटुंबातील सदस्यासारखाच होता, असेही त्यांनी सांगितले. "तो मला 'पापाजी' म्हणायचा. त्याच्या मृत्यूने दोन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे," असे म्हणत त्यांनी दुःख व्यक्त केले.
सिया आणि चेतन चौधरी यांच्यात प्रेमसंबंध असल्याची आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती, असा दावाही त्यांनी केला. मुलीच्या अटकेचा मानसिक धक्का इतका मोठा होता की, त्यांना काही काळ अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले, अशी माहितीही त्यांनी दिली.
नेमके प्रकरण काय?
१८ जून रोजी पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल यांचा दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र तपासादरम्यान पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी पूर्वनियोजित कट रचून त्याची हत्या केल्याचा दावा केला. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, सध्या तपास सुरू आहे. या आरोपांबाबत अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होणार आहे.