मराठा समाजाच्या प्रगतीसाठी सरकारचा रोडमॅप; 'सारथी'च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

    26-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : मराठा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि कौशल्य विकासासाठी राज्य सरकार विविध स्तरांवर काम करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सारथी संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकारने राबविलेल्या योजनांचा आढावा घेतला. मराठा आरक्षणासाठी निघालेल्या शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मोर्चांचे कौतुक करत, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भविष्यातही व्यापक उपक्रम राबविले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू करण्यात आली. या योजनेत विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन आणि पुस्तकांच्या खर्चासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

रोजगार आणि उद्योग क्षेत्रात मराठा समाजातील तरुणांना संधी मिळावी यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला नवसंजीवनी देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. बिनव्याजी कर्ज योजनेमुळे आतापर्यंत जवळपास पावणे दोन लाख उद्योजक घडले असून, महामंडळाच्या माध्यमातून सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या कर्जावरील व्याजापोटी राज्य सरकारकडून सुमारे १,५०० कोटी रुपयांचा भार उचलला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा सहभाग वाढवण्यासाठी २०१८ मध्ये सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जात असून, आज अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यश मिळवत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पीएचडीसह उच्च शिक्षण आणि कौशल्य विकासासाठीही सारथी प्रभावीपणे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.

याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), संगणक तंत्रज्ञान, आधुनिक शेती, ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि उत्पादन क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्य विकासावरही सरकारचा भर असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेतीसाठी विकसित करण्यात आलेल्या डिजिटल ॲपवर सुमारे ५० लाख शेतकरी जोडले गेले असून, त्यांना पिक व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील विविध विभागीय मुख्यालयांमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारली जात असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.