
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, कँटीन, क्लाउड किचन आणि अन्य खाद्य व्यवसायांसाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नवीन आणि कठोर मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या नियमांची घोषणा करत नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
एफडीएने अलीकडे विविध खाद्य आस्थापनांची तपासणी केली असता अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आढळून आल्या. अस्वच्छ स्वयंपाकगृहे, एकाच तेलाचा वारंवार वापर, अन्न साठवणुकीतील निष्काळजीपणा आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव अशा बाबी निदर्शनास आल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
नवीन नियमांनुसार सर्व खाद्य व्यवसायांकडे आवश्यक परवाने आणि नोंदणी असणे बंधनकारक राहणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे, ग्राहकांसाठी मोफत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठेवणे आणि त्यासंदर्भातील सूचना फलक लावणे आवश्यक असेल.
ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांबाबत अधिक पारदर्शकता राखण्यासाठी मेन्यू कार्डमध्ये कॅलरी, पोषणमूल्ये आणि अॅलर्जीशी संबंधित माहिती नमूद करावी लागणार आहे. तसेच एफएसएसएआयच्या नियमांचे काटेकोर पालन, वापरलेल्या तेलाची योग्य विल्हेवाट आणि मोठ्या उलाढालीच्या आस्थापनांसाठी नियमित अन्नसुरक्षा ऑडिट अनिवार्य करण्यात आले आहे.
स्वयंपाकघरासाठीही विशेष निकष निश्चित करण्यात आले आहेत. स्वच्छ आणि धुण्यायोग्य भिंती, एक्झॉस्ट व वायुवीजनाची व्यवस्था, कच्च्या मालाची स्वतंत्र साठवणूक, शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचे वेगळे व्यवस्थापन, नियमित पेस्ट कंट्रोल आणि कीटकमुक्त परिसर राखणे आवश्यक असेल.
याशिवाय अन्न साठवणीसाठी तापमानाचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत. गरम पदार्थ ६० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त, थंड पदार्थ ४ अंश सेल्सिअसपर्यंत आणि गोठवलेले पदार्थ उणे १८ अंश सेल्सिअस तापमानात ठेवणे बंधनकारक असेल.
एफडीएने स्पष्ट केले आहे की, या नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून राज्यभर तपासणी मोहीम सातत्याने राबवली जाणार आहे. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.