वाडीतील भरधाव कारचा थरार; तीन दुचाकींना धडक, युवक ४०० मीटरपर्यंत फरफटला

    25-Jun-2026
Total Views |

नागपूर : वाडी येथील भाजी मंडई परिसरात उशिरा रात्री एका भरधाव कारने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना घडली. वेगाने धावणाऱ्या कारने सलग तीन दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघातात एका युवकाला गंभीर दुखापत झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालकाने प्रथम एका स्कूटीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर स्कूटीस्वार युवक कारमध्ये अडकला आणि त्याला सुमारे ४०० मीटरपर्यंत भाजी मंडईपासून नाका क्रमांक १० पर्यंत फरफटत नेण्यात आले. या धक्कादायक घटनेत वाडी येथील पंकज शामकुंवर हे गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, अपघातावेळी कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा परिसरात आहे. प्रत्यक्षदर्शींनीही चालकाची हालचाल संशयास्पद असल्याचा दावा केला आहे. अपघातानंतर कारचालक वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच वाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक तपास सुरू केला. मात्र, घटनेनंतर अनेक तास उलटल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या पोलिसांकडून कारचालकाचा शोध सुरू असून संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.