आरोग्य यंत्रणेला नवे बळ; राज्यात ५,२२३ पदांची निर्मिती, भरती प्रक्रियेला गती

    25-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्यातील आरोग्य सुविधा अधिक प्रभावी आणि सक्षम करण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. विविध सरकारी रुग्णलये आणि आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी ५ हजार २२३ नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.

शासनाच्या निर्णयानुसार राज्यभरातील नव्याने उभारण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित करण्यात आलेल्या २५९ आरोग्य संस्थांमध्ये कर्मचारी नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयांच्या खाटांची संख्या वाढविण्यात येत असल्याने अतिरिक्त डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता निर्माण झाली आहे.

या पदनिर्मितीत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, औषधनिर्माता, लिपिक, कार्यालयीन कर्मचारी, शिपाई, सफाई कर्मचारी आणि इतर सहाय्यक पदांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील अनेक जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांचा विस्तार करण्यात येत असून काही ठिकाणी खाटांची क्षमता ३० वरून ५०, तर काही ठिकाणी १०० खाटांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णसेवा अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.

तसेच ट्रॉमा केअर युनिट, आयुष रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आदिवासी आरोग्य केंद्रे आणि राज्यस्तरीय आरोग्य संस्थांमध्येही नव्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू होणार असून हजारो इच्छुक उमेदवारांना सरकारी सेवेत संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आरोग्य विभागातील या निर्णयामुळे एकीकडे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत, तर दुसरीकडे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्यास हातभार लागणार आहे.