
Image Source:(Internet)
धाराशिव : शिवसेना (ठाकरे गट) सोडून शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांच्या पक्षांतरावरून राज्यातील राजकारण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. या खासदारांना पक्ष बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रलोभने देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
धाराशिव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, *‘ऑपरेशन टायगर’*च्या नावाखाली ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या खासदारांना 80 ते 90 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 250 कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात आल्याची चर्चा आहे. या माध्यमातून राजकीय बाजार मांडण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यातील आणि केंद्रातील भाजप नेतृत्वामध्ये अंतर्गत मतभेद असल्याचाही दावा त्यांनी केला. केंद्रातील भाजप नेतृत्व एकनाथ शिंदे यांना बळ देण्याचा प्रयत्न करत असल्याचे, तर राज्यातील भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला प्राधान्य देत असल्याचे त्यांनी म्हटले. यामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक स्पष्ट होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, राज्यात *‘ऑपरेशन तुतारी’*ची चर्चा सुरू असल्याबाबत विचारले असता, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)मधील कोणताही आमदार किंवा खासदार पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. पक्षातील सर्व लोक शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकसंघ असल्याचे ते म्हणाले.
शिवसेनेच्या सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले असून, रोहित पवार यांच्या या आरोपांमुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.