
नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर आता देशातील महत्त्वाचे विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक केंद्र बनण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरसाठी जागतिक दर्जाचे आधुनिक विमानतळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याची घोषणा केली असून विमानतळ हस्तांतरण प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाल्याचे सांगितले.
नागपूर विमानतळाच्या ग्राउंड फील्ड प्रकल्पांतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर आता जीएमआर कंपनीच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधा असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमानतळ विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या कार्गो हब योजनेलाही नवसंजीवनी मिळणार आहे.
फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांचे आभार मानले. नागपूरला देशातील प्रमुख कार्गो हब म्हणून विकसित करण्याचे स्वप्न दीर्घकाळापासून पाहिले जात होते. मात्र विविध तांत्रिक अडचणी आणि न्यायालयीन प्रक्रियांमुळे हा प्रकल्प रखडला होता. आता त्या सर्व अडथळ्यांवर मात झाल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, नव्या विमानतळामुळे नागपूरची ओळख केवळ विदर्भाची राजधानी म्हणून नव्हे, तर मध्य भारतातील महत्त्वाचे हवाई वाहतूक आणि व्यापार केंद्र म्हणून निर्माण होईल. उद्योग, कृषी, निर्यात, सेवा क्षेत्र आणि लॉजिस्टिक व्यवसायाला याचा मोठा फायदा होणार असून हजारो युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
दरम्यान, राज्यातील काही ठिकाणी सुरू असलेल्या धमकीच्या वक्तव्यांवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोर भूमिका व्यक्त केली. कोणाचेही घर बॉम्बने उडवण्यासारखी भाषा अस्वीकार्य असून अशा धमक्यांना सरकार आणि पोलीस यंत्रणा गांभीर्याने घेत असल्याचे त्यांनी सांगितले. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.