
Image Source:(Internet)
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) सोडून शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या कथित धमकीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत संजय दिना पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वीपर्यंत पक्षात असताना शिस्तीत वावरणारे लोक सत्तेत गेल्यानंतर अचानक बदललेले दिसत आहेत. अवघ्या काही दिवसांत सत्ता आणि पैशाचा प्रभाव एखाद्या व्यक्तीला किती बदलू शकतो, याचे उदाहरण संजय दिना पाटील यांच्या वर्तनातून दिसत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
पत्रकारांना अर्वाच्य भाषेत धमक्या देणे ही गंभीर बाब असून याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. "कोणत्या कमिश्नरकडे जायचे ते जा," असे वक्तव्य करून संजय दिना पाटील यांनी पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिल्याचा आरोप त्यांनी केला.
गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने या प्रकरणावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी अंधारे यांनी केली. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि आता पत्रकारांनाही धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यात महिला, विद्यार्थी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना पत्रकारांनाही खुलेआम धमक्या दिल्या जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अशा प्रवृत्तींना संरक्षण दिले जात आहे का, असा सवाल उपस्थित करत अंधारे यांनी गृहखात्यावरही निशाणा साधला.
दरम्यान, पत्रकारांना दिलेल्या कथित धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.