राज्यातील कोचिंग क्लासेसची होणार सुरक्षा पडताळणी?विनापरवाना संस्थांवर कारवाईची मागणी

    25-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या भीषण आगीत १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोचिंग संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा विधानसभेत गाजला. भाजप आमदार प्रवीण दटके यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत राज्यभरातील कोचिंग क्लासेसची विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी सरकारकडे केली.

२२ जून २०२६ रोजी लखनऊच्या अलीगंज भागातील एका व्यावसायिक इमारतीत आग लागून १५ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित क्लासमध्ये अग्निसुरक्षेच्या आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या. तसेच फायर एनओसीसह विविध आवश्यक परवानग्यांचाही अभाव असल्याचे उघड झाले आहे.

या दुर्घटनेचा दाखला देत दटके यांनी राज्यातील कोचिंग क्लासेस चालणाऱ्या इमारतींची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली. संबंधित संस्थांकडे बांधकाम परवानगी, अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र (फायर एनओसी) आणि इतर आवश्यक मंजुरी आहेत का, याची सखोल पडताळणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या विनापरवाना कोचिंग क्लासेसविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. अशा संस्थांना तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्याचीही त्यांनी मागणी केली.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असल्याचे नमूद करत, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा दटके यांनी व्यक्त केली.