
Image Source:(Internet)
नागपूर : राज्य शासनाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत महत्त्वाचे आदेश जारी केले असून नागपूर शहराच्या पोलीस नेतृत्वात बदल करण्यात आला आहे. विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत असलेले विश्वास नांगरे-पाटील आता नागपूर शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारतील. तर डॉ. सिंघल यांच्याकडे एसीबीच्या अपर पोलीस महासंचालकपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील तरतुदींनुसार सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेऊन ही बदली करण्यात आली आहे. याबाबत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांना देण्यात आल्या आहेत.
धाडसी निर्णय, शिस्तबद्ध कारभार आणि जनतेशी थेट संवाद या वैशिष्ट्यांमुळे विश्वास नांगरे-पाटील यांची स्वतंत्र ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर नागपूर पोलीस दलाच्या कामकाजात अधिक गतिमानता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, डॉ. रविंद्र सिंगल यांनी आपल्या कार्यकाळात शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
या बदल्यांमुळे नागपूरच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून शहराच्या पोलीस प्रशासनात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.