Image Source:(Internet)
मुंबई : चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये (Local) झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी रेल्वे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रोशन सुवर्णा याला जीआरपीने ताब्यात घेतले असून पुढील चौकशीसाठी त्याला बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात आणण्यात येत आहे.
मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मंगळवारी (२३ जून) रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चर्चगेट ते नालासोपारा फास्ट लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यातून एका तरुणाचा जीव गेला.
माहितीनुसार, २२ वर्षीय मयंक लोहार हा अंधेरी येथून घरी परतत असताना अंधेरी ते बोरिवलीदरम्यान आरोपी रोशन सुवर्णा याच्याशी त्याचा वाद झाला. मुसळधार पावसामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. संतापलेल्या आरोपीने बॅगेतून चाकू काढून मयंकच्या पोटात वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या मयंकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. बोरिवली जीआरपीने विविध तांत्रिक पुरावे आणि तपासाच्या आधारे त्याचा शोध घेत अखेर त्याला ताब्यात घेतले. आरोपीच्या अटकेनंतर रेल्वे पोलीस या प्रकरणाची अधिक माहिती पत्रकार परिषदेत देणार असल्याचे सांगितले जात आहे.
मयंक लोहार हा विरार पूर्व येथील सुरमनगर परिसरात कुटुंबासह राहत होता. अंधेरीतील एका नामांकित शोरूममध्ये तो सेल्समन म्हणून कार्यरत होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
दरम्यान, किरकोळ वादातून लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या हत्येने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.