मुंबईत धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार; दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने हत्या

    24-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मंगळवारी रात्री धक्कादायक घटना घडली. चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात किरकोळ वादाचे रूपांतर थेट हत्येत झाले. मुसळधार पावसात डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून एका प्रवाशाने २२ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

मृत तरुणाचे नाव मयंक लोहार (२२) असे असून तो मंगळवारी रात्री चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलने प्रवास करत होता. त्यावेळी मुंबईत जोरदार पाऊस सुरू होता. लोकल अंधेरी ते बोरिवली दरम्यान धावत असताना प्रथम श्रेणी डब्यात दरवाजा बंद करण्यावरून मयंक आणि एका प्रवाशामध्ये वाद झाला.

सुरुवातीला शाब्दिक चकमकीने सुरू झालेला वाद काही क्षणांतच उग्र झाला. संतापलेल्या आरोपीने आपल्या बॅगेतून धारदार चाकू काढत मयंकच्या पोटात वार केल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्याने डब्यातील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेला मयंक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

रात्री ११.०४ वाजता लोकल बोरिवली स्थानकात पोहोचल्यानंतर रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली. डॉक्टरांनी तपासणीनंतर रात्री ११.२२ वाजता मयंकला मृत घोषित केले. मात्र, ट्रेन पूर्णपणे थांबण्यापूर्वीच आरोपी डब्यातून उतरून पसार झाला.

घटनेनंतर बोरिवली जीआरपीने तातडीने तपास सुरू केला आहे. स्थानक परिसरातील आणि रेल्वेच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून आरोपीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनानेही या प्रकरणातील सर्व तांत्रिक पुरावे तपास यंत्रणांकडे सुपूर्द केले आहेत.

दरम्यान, लोकल ट्रेनमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याने मुंबईच्या लोकल प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

काही महिन्यांपूर्वी मालाड रेल्वे स्थानकावरही अशाच प्रकारे किरकोळ वादातून एका महाविद्यालयीन प्राध्यापकाची चाकूने हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.